संसदेत सुरू असलेल्या ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांवरील विशेष चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (दि.८) भाजपवर थेट हल्लाबोल केला. "वंदे मातरम् हे स्वातंत्र्यलढ्यातून आले. मग भाजप यावर दावा का करत आहे?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
राज्यसभेच्या हँडबुकमधील बदलांवर प्रश्नचिन्ह
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "नव्याने जारी झालेल्या राज्यसभा हँडबुकमध्ये ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ सारख्या घोषणांवर निर्बंध घालण्यात आल्याचे दिसते. हे हँडबुक भाजपच्या सत्ताकाळातच बदलले. त्यामुळे हे स्पष्ट होते की, देशभक्ती असो, हिंदुत्व असो किंवा ‘वंदे मातरम्’. भाजप त्यांचा वापर फक्त निवडणूक काळात करते आणि नंतर स्वतःच त्यांना मर्यादा लावते,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
‘वंदे मातरम्’वर भाजपचा अधिकार काय?’
ठाकरेंनी भाजपच्या ऐतिहासिक दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “वंदे मातरम् हे स्वातंत्र्यलढ्यातून आले. ब्रिटिशांविरुद्ध झुंज देताना भारतीयांनी ते स्वीकारले. पण भाजप त्यावेळी त्या लढ्यात सहभागी नव्हता, उलट त्यांचा विरोधच होता. मग आज कोणत्या अधिकाराने भाजप या गीताचा दावा करत आहे?”
संसदेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
हिवाळी अधिवेशनात आज लोकसभा आणि राज्यसभेत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांवरील चर्चा घेण्यात आली. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा सुरू करताना असा दावा केला की, "वंदे मातरम् या गीताला भूतकाळात अनेकदा विरोध सहन करावा लागला. ते नेहमीच दुर्लक्षित केले गेले. १९३७ साली जिन्नांच्या विरोधानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून ‘वंदे मातरम्’चा वापर मुस्लिम समाजाला चिथावणी देऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची प्रतिक्रिया
या वक्तव्याला प्रत्युत्तर देत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले की,“वंदे मातरम् वर चर्चा ही वास्तविक मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि पश्चिम बंगाल निवडणुकांपूर्वी वातावरण तयार करण्यासाठीच होत आहे.”
काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून पलटवार झाल्यानंतर आता भाजप यावर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.