

मुंबई : राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये मुंबईत ८ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. मानखुर्द-गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येत असून एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम या पक्षाची मुसंडी पाहण्यास मिळाली. सोलापूरमध्ये ८, नांदेडमध्ये १५ तर धुळ्यात १० असे एकूण ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती महापालिकेत १२, ठाण्यात ५, नागपूरात ६ ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमचे १२५ नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगाव महापालिकेत एमआयएमचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. अहिल्यानगर २, जालना २, चंद्रपूर १, अकोला येथून ३ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात समाजवादी पक्षाला मागे सारत एमआयएमची सरशी झाली आहे.