

सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.अशातच, रविवारी (दि.१४) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे आमदार नागपूरमधील रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात जाऊन हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक एम. एस. गोलवलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र,अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली. यावर पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट देणे टाळले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) राज्याच्या विकासासाठीच महायुतीत सहभागी झाला आहे, असा खुलासा पक्षाने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर आधारित आहे, असे पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले. अजित पवार यांनी हेडगेवार स्मारकाला भेट न देण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपचे मंत्री व आमदार स्मृती मंदिराला भेट देतात. मात्र गेल्या वर्षी ४१ आमदार असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त राजू करेमोरे आणि राजकुमार बडोले या दोन आमदारांनीच स्मृती मंदिराला भेट दिली होती. या संदर्भात आनंद परांजपे म्हणाले, “आम्ही आमच्या तत्त्वांवर ठाम आहोत. राज्याचा विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे.” अजित पवार यांनी यापूर्वीही हेडगेवार स्मारक भेट टाळली असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “आरएसएसची विचारधारा कॅबिनेट बैठकींत ऐकली जात असताना, ती मान्य नसेल तर अजित पवार यांचा पक्ष सत्तेत कसा सहभागी आहे, हा प्रश्न आहे.” ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सावंत यांनी आरएसएसवर टीका करत, संघ लोकशाही आणि संविधान कमकुवत करणारी विचारसरणी पसरवत असल्याचा आरोप केला. शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना आमदार हेडगेवार स्मारकाला भेट देत असताना, त्यांचा भर “पैशाच्या जोरावर सत्ता कशी मिळवायची आणि घटनात्मक लोकशाही कशी उद्ध्वस्त करायची” यावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरएसएसला अस्तित्वात येऊन १०० वर्षांहून अधिक काळ झाला असतानाही हिंदुत्व नेमके काय आहे, याची स्पष्ट व्याख्या संघाने केली नाही, असा दावा सावंत यांनी केला. “आता तरी त्यांनी हिंदुत्वाचा खरा अर्थ स्पष्ट करावा,” असेही ते म्हणाले. सचिन सावंत यांनी पुढे आरोप केला की, संघाच्या बैठका बौद्धिक चर्चेपेक्षा समाजात फूट पाडणाऱ्या कथानकांवर अधिक केंद्रित असतात.