सातारा : वक्तशीर, स्पष्टवक्ता, हजरजबाबी, प्रशासनावर पकड, आक्रमक नेतृत्व, कामाचा जागेवर सोक्षमोक्ष लावणारा धडाकेबाज नेता म्हणजे अजित पवार! वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा अडचणीतही सापडले. मात्र, त्याबद्दल प्रायश्चित्तही घेतले. खऱ्या अर्थानं राजकारणातील हा 'दादा' माणूस विमान अपघातात अकाली गेला आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाणावले.
प्रीतिसंगमावर हमखास उपस्थिती
यशवंत विचारांच्या मुशीत आणि शरद पवारांच्या तालमीत अजितदादांचे नेतृत्व घडले होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे. झपाटून काम करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. निवडणूक काळात पहाटेच प्रचाराला ते घरातून बाहेर पडायचे.
२५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी प्रीतिसंगमावर ते हमखास उपस्थित असायचेच. अजितदादा आपल्या रोखठोक वक्तव्याने सभा दणाणून सोडायचे. दुष्काळी परिस्थितीत ६ एप्रिल २०१३ रोजी इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील जाहीर सभेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. शिवसेना, भाजप, मनसेने तीन दिवस सभागृहाचे काम बंद पाडले होते. त्यानंतर आपल्या वक्तव्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी अजितदादांनी थेट कराड गाठले होते. १४ एप्रिल २०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी दिवसभर पाणी न पिता त्यांनी आत्मक्लेश केला होता.
फेसबुकद्वारे चूक कबूल
तत्पूर्वी अजितदादांनी तातडीने फेसबुकवर एक पत्र शेअर केले होते. फेसबुकवरील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नमस्कार, राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना अनेक वेळेला कौतुक आणि टीका यात चढ-उतार होत असतात. या सर्व परिक्रमेत एखादा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असा येत असतो की, एकतर तो तुम्हाला खूप आनंद देऊन जातो किंवा वेदनाही देऊन जातो. माझ्याही बाबतीत तेच घडले. पाणीप्रश्नाचा उल्लेख आल्याने माझ्या तोंडातून अपशब्द गेले. राज्याचा जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून हे मी बोलायला नको होते, याबद्दल दुमत नाही. मी ते गमतीने वा चेष्टेनेही बोलायला नको होते, हे मात्र निश्चित, अशा शब्दांत त्यांनी झालेली चूक मोठ्या मनाने कबूल केली होती.
टगेगिरीचा उल्लेख
याचबरोबर, अजितदादांचे व्यक्तिमत्त्व सर्वस्पर्शी तसेच धडाकेबाज होते. २०१४ मध्ये तासगाव अर्बन बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी टगेगिरीचा उल्लेख केला होता. एक वेळ आमदार-खासदार म्हणून निवडून येणे सोपे, मात्र तालुका पातळीवर निवडून येण्यासाठी गावानं ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी सुद्धा तालुका पातळीवर निवडून आलो आहे, त्याअर्थी मीही टग्याच आहे, असे अजित पवार त्यावेळी म्हणाले होते.
आता चुकणार नाही
पिंपरी-चिंचवडमध्ये ४ जून २०२२ रोजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजितदादांनी जोरदार फटकेबाजी केली होती. त्यांच्या भाषणाला प्रचंड टाळ्या पडत असताना स्वतःला आवरत अजितदादांनी जुनी आठवण सांगितली होती. टाळ्या पडल्या की खूश होऊन नेता घसरायला लागतो, पण मी आता चुकणार नाही. एकदा माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. त्याचे प्रायश्चित्त अजून करतोय, असे त्यांनी सांगितले होते.