"माझ्यासारख्या गरीब मुलाला सोन्यासारखं घर..."; अजितदादांच्या निधनानंतर सूरज चव्हाण भावुक, मराठी कलाविश्वही शोकाकुल

सूरज हा बारामती तालुक्यातील मोढवे गावचा रहिवासी आहे. आपल्या गावातील मुलाने 'बिग बॉस'सारखा मोठा शो जिंकल्यानंतर अजित पवार यांनी सूरजला स्वतःचं हक्काचं घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं.
"माझ्यासारख्या गरीब मुलाला सोन्यासारखं घर..."; अजितदादांच्या निधनानंतर सूरज चव्हाण भावुक, मराठी कलाविश्वही शोकाकुल
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि. २८) सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी ते मुंबईहून खासगी चार्टर्ड विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र बारामतीत लँडिंगदरम्यान विमान कोसळले. त्यांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

अजित पवार यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळासह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आनंद हरपला… सूरज चव्हाणची भावनिक प्रतिक्रिया

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याने अजित पवार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. सूरजने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अजित पवार यांचा फोटो शेअर करत 'धर्मवीर' चित्रपटातील 'आनंद हरपला' हे गाणं लावून भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच सूरजने एक भावुक पोस्टही शेअर केली असून त्यात तो म्हणतो, "मित्रांनो माझा देव चोरला आज.. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं… माझी काळजी घेतली… मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला लई वाईट वाटतय… लई दुःख होतंय…"

पुढे तो म्हणाला, "माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं… मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन… दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली."

सूरज चव्हाणची इंस्टाग्राम स्टोरी
सूरज चव्हाणची इंस्टाग्राम स्टोरी

सूरज हा बारामती तालुक्यातील मोढवे गावचा रहिवासी आहे. आपल्या गावातील मुलाने 'बिग बॉस'सारखा मोठा शो जिंकल्यानंतर अजित पवार यांनी सूरजला स्वतःचं हक्काचं घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. अवघ्या एका वर्षात सूरज आपल्या नव्या घरात राहायला गेला होता. विशेष म्हणजे घराचं बांधकाम सुरू असताना अजित पवार स्वतः प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाची बातमी समोर येताच सूरजसह अनेकांच्या भावना अनावर झाल्या.

मराठी कलाकारांकडून भावुक शब्दांत श्रद्धांजली

अभिनेत्री सायली संजीवने इंस्टाग्राम वर अजित दादांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, "ही गोष्ट स्वीकारणं अत्यंत कठीण आहे… अजित दादा तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे… आज घरातलं कुणीतरी गेलं असं वाटतय।..आम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हे स्वीकारण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..तुमच्या बरोबर ह्या अपघातात जे गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

गायक-संगीतकार सलील कुलकर्णी यांनी “विश्वासच बसत नाही… अजितदादा” अशी प्रतिक्रिया दिली.

अभिनेता कपिल होनराव याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणतो, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा, जनमानसात मिसळून काम करणारा एक कणखर आणि प्रभावी नेता आज हरपला. कामाला प्राधान्य, निर्णयांमध्ये ठामपणा आणि साधी पण प्रभावी कामाची पद्धत हीच त्यांची ओळख. एखादा नेता आपलाच वाटतो… आणि अशा नेत्याचं जाणं मनाला चटका लावून जातं..." अशा शब्दांत कपिलने अजित दादांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय गायिका बेला शेंडे, आर्या आंबेकर, हेमांगी कवी, नम्रता संभेराव, तेजश्री प्रधान, प्रथमेश परब, शुभांगी गोखले, सुमित पुसावळे, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सविस्तर चौकशी करणार असून ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि कॉकपिट रेकॉर्डिंग तपासल्यानंतरच अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे. 

logo
marathi.freepressjournal.in