"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (दि. २८) सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत राज्यामध्ये आज शासकीय सुट्टी जाहीर केली असून तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (दि. २८) सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगवेळी झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टी जाहीर करत तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

"महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण दिवस" - देवेंद्र फडणवीस

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अतिशय दुःखद घटना घडली आहे. अनाकलीनय परिस्थितीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांत प्रचंड मोठी आस्था होती. अजित दादा संघर्षशील अशाप्रकारचे नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं अशाप्रकारचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. कारण, अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते. अशा काळात त्यांचं निघून जाणं, हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारं आहे," असे फडणवीस म्हणाले.

दिलदार, दमदार मित्र गेला..

यानंतर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "माझ्याकरता वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार असा मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा सर्वांशी चर्चा करून त्यांना घडलेल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. याबद्दल त्यांनीही प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. संपूर्ण प्रकरणात हळहळ पसरली आहे. पुढच्या सर्व गोष्टी त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील."

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

दरम्यान, सकाळी सुप्रिया सुळे यांच्याशी तसेच पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

"महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली असून, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. लोकनेता निघून गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणं कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही," असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in