"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे सभा घेतली. उदयनराजेंना एक लाख मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
अजित पवार
अजित पवार अजित पवार

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे प्रचार सभा घेतली. उदयनराजेंना एक लाख मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना राज्यसभेचे खासदार करण्याचं आश्वासनही अजितदादांनी दिलंय. 'आता उदयनराजेंचं काम करा, जूनमध्ये नितीन काकांना राज्यसभेवर नाही घेतलं तर पवाराची औलाद सांगायचो नाही,' असं अजित पवार म्हणाले.

उदयनराजेंच्या समर्थनार्थ काय बोलले अजितदादा?

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान ७ मे रोजी पार पडत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून येथे महायुतीकडून भाजपच्या तिकीटावर उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे प्रचार सभा घेतली. या सभेत उदयनराजेंना एक लाख मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तर पवारांची औलाद सांगायचो नाही...: अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र महायुतीच्या जागावाटपात अखेरच्या क्षणी ही जागा भाजपने स्वतःकडे घेतली आणि उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं नितीन काका नाराज झाले होते. आता अजितदादांनी त्यांना राज्यसभेचं खासदार करण्याचं आश्वासन दिलंय. तसं न केल्यास पवारांची औलाद सांगायचो नाही, असंही अजित पवार म्हणाले.

नितीन पाटलांना राज्यसभेवर घेणार...

अजित पवार म्हणाले की, "महायुतीच्या उमेदवाराला वाई, महाबळेश्वर, खंडाळा येथून एक लाखाचं मताधिक्य द्या. कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना? जे आहेत तेही कमळाचं काम करतात. आपणही कमळाचं काम करायचं आहे. तुम्ही ते काम करून दाखवा...मी नाही जूनमध्ये नितीन काकाला राज्यसभेवर खासदार केलं, तर पवाराची औलाद सांगायचो नाही..."

तुम्हाला काहीच न करता एक खासदार देतोय. उदयनराजे आपलं काम करतीलच. पण त्यांना कामातून वेळ मिळाला नाहीच तर नितीन काका असतीलच असंही अजितदादा म्हणाले...आपण विकासाकरता काम करूया. एक एक खासदार नरेंद्र मोदींना पाठींबा देण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in