ऑफीसमध्ये बसून काय काम करता? अभियंताला जाब विचारून संतप्त तरुणांनी महावितरण उपकेंद्रात लावली आग|Video

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये मागील काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे वारंवार वीज खंडित केली जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रागातून दोन तरुणांनी मोठे पाऊल उचलले. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त झालेल्या या तरुणांनी महावितरण उपकेंद्रात जाऊन चक्क पेट्रोल ओतून टेबल-खुर्ची जाळल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
ऑफीसमध्ये बसून काय काम करता? अभियंताला जाब विचारून संतप्त तरुणांनी महावितरण उपकेंद्रात लावली आग|Video
Published on

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये मागील काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे वारंवार वीज खंडित केली जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रागातून दोन तरुणांनी मोठे पाऊल उचलले. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त झालेल्या या तरुणांनी महावितरण उपकेंद्रात जाऊन चक्क पेट्रोल ओतून टेबल-खुर्ची जाळल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

या प्रकरणी कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे (३८, अमरावती) यांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे दोघांना अटक केली असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे आणि शासकीय कार्यालयाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती ग्रामीण डिव्हिजनच्या भातकुली सबडिव्हीजन अंतर्गत वलगाव उपकेंद्रात रविवारी ही घटना घडली. उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, गोपाल नेरकर, सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे उपस्थित होते. यावेळी अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे हे दोघेजण पेट्रोल आणि काडीपेटी घेऊन आले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना ''तुम्ही इथे बसून करता काय?'' असा जाब विचारला. त्यानंतर टेबल-खुर्चीवर पेट्रोल टाकून काडीपेटीने आग लावली. पुढे त्यांनी खिडकीचे तावदान फोडले. यामध्ये शासकीय दस्तावेज जळले असून शासकीय कार्यालयाचे नुकसान झाले आहे. शासकीय कर्मचाऱ्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. ''तुम्ही कायदा हातात घेऊ नका'' असे सांगूनही तरुणांनी शासकीय कार्यालयात आग लावली.

घटनेनंतर त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे उपकेंद्रात गोंधळ निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

logo
marathi.freepressjournal.in