
अमरावती शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्यामुळे सासरच्या लोकांकडून मानसिक छळ सहन करणाऱ्या ३२ वर्षीय महिला आरोग्य अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव शुभांगी निलेश तायवडे असून ती सीएचओ (समुदाय आरोग्य अधिकारी) म्हणून कार्यरत होती.
ही दुर्दैवी घटना अमरावतीच्या तपोवन संकुलातील जयभोले कॉलनीत रविवारी (२५ मे) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. शुभांगी मूळची नागपूरची असून तिचा विवाह नोव्हेंबर २०११ मध्ये नीलेश तायवडे (वय ३५) या बँक मॅनेजरशी झाला होता. शुभांगीला दोन मुली आहेत. त्यापैकी धाकटी मुलगी फक्त १३ महिन्यांची आहे.
शुभांगीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, दुसऱ्यांदा मुलगी झाल्यापासून शुभांगीवर तिचा पती नीलेश, सासू, दीर, नणंद आणि पतीचा एक मित्र सतत टोमणे मारत होते. घरात तिचा मानसिक छळ होत होता. या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरी मुलींच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच शुभांगीचे वडील राजेंद्र तुरकाणे (वय ६५, रा. नागपूर) यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती नीलेश तायवडे, ७० वर्षीय सासू, नीलेशचा भाऊ नितीन तायवडे (वय ३८), वहिनी हातुर्ना (वय ४५) आणि नितीनचा मित्र नयन रामटेके यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्येच्या एक दिवस आधी, २४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शुभांगीने तिच्या वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. त्या संवादात तिने तिला सासरी होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल सांगितले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. शुभांगीचे कुटुंबीय पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांनी जावयाने लेकीचा खून केला असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शुभांगीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, समाजातील स्त्रीभ्रूणभेद आणि मुलींच्या जन्माविषयी असणारी नकारात्मक मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि दोन निष्पाप मुलींचे भविष्य सुरक्षित राहावे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.