
विदर्भ व महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशाला जोडणारी नवी 'अमृत भारत एक्सप्रेस' उद्यापासून धावणार आहे. या ट्रेनचा शुभारंभ २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोठी भेट मानली जात आहे.
महाराष्ट्र-विदर्भासाठी फायदा
गुजरातमध्ये काम करणारे कामगार व नोकरदार, तसेच महाराष्ट्रातील प्रवाशांना ही ट्रेन मोठा दिलासा देणार आहे. विदर्भातून थेट गुजरात आणि ओडिशा राज्यांमध्ये प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. सुट्टीच्या हंगामात जलद व थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा व वेळेत होईल.
महाराष्ट्रातील स्थानके
नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया
काय आहेत अत्याधुनिक सुविधा?
ही रेल्वे गुजरातमधील सुरत (उधना) येथून ओडिशातील ब्रह्मपूर स्थानकापर्यंत धावणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील वर्ध्यासह अनेक प्रमुख स्थानकांवर ही ट्रेन थांबेल. या गाडीचा वेग अंदाजे १६० ते १८० किमी प्रतितास असेल. या रेल्वेत एकूण २२ कोचेस असतील, ज्यात ११ सामान्य श्रेणीचे, ८ स्लीपर, १ पँट्री कार, २ लगेज व्हॅन आणि १ कोच अपंग प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात कवच प्रणाली, सेमी-ऑटोमॅटिक कप्लर्स, क्रॅश ट्यूब, EP Assisted ब्रेक सिस्टीम यांचा समावेश आहे. नॉन-एसी डब्यांमध्ये पहिल्यांदाच अग्निशमन शोधक यंत्रणा बसवली गेली आहे. तसेच सीलबंद गँगवे, आपत्कालीन टॉकबॅक युनिट, व्हॅक्यूम इव्हॅक्युएशन सिस्टीम आणि बाह्य आपत्कालीन दिवे यामुळे सुरक्षिततेला नवा दर्जा मिळतो.
प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यात फोल्डेबल स्नॅक टेबल, मोबाईल व बाटली होल्डर, आरामदायी सीट्स आणि बर्थ, फास्ट चार्जिंग पोर्ट, रेडियम फ्लोअर स्ट्रिप्स आणि पँट्री कार यांचा समावेश आहे. स्वच्छतागृहांमध्ये इलेक्ट्रो-न्यूमॅटिक फ्लशिंग, ऑटोमॅटिक साबण डिस्पेंसर आणि अग्निशमन प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच अपंग प्रवाशांसाठी स्वतंत्र व सुसज्ज शौचालय आहे.
या गाडीत प्रवास करण्यासाठी इतर ट्रेनपेक्षा अंदाजे १५% जास्त भाडे आकारले जाणार आहे. मात्र, मिळणाऱ्या आधुनिक सोयी, सुरक्षितता आणि आराम लक्षात घेता हा प्रवास प्रवाशांसाठी किफायतशीर ठरणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले.