

पेण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा अखेर मिटल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त होत होती. मात्र शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
त्याचवेळी जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीतील अस्वस्थता उघड केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जुईली दळवी यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. तसेच आमदार महेंद्र दळवी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत कोकणातील पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती.
या पार्श्वभूमीवर कोकणातील जागेवरून कोणताही वाद निर्माण होऊ नये आणि महायुतीची एकजूट कायम राहावी, यासाठी मंगळवारी मुंबईतील एक्स्प्रेस टॉवर येथे मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महायुतीचा उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याबाबत सहमती झाल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुतीचा धर्म पाळण्याच्या स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे सांगितले जाते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नाराज नेत्यांनीही समन्वयाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी विकास गोगावले हे देखील उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे आव्हान
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारे कोकणात शिवसेनेची ताकद वाढल्याचा दावा केला जात असला, तरी महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील वादावर पडदा पडल्याचे मानले जात आहे. परिणामी अनिकेत तटकरे यांचा निवडणुकीतील मार्ग मोकळा झाला असून आता त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.