

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी अधिकृतरीत्या बुधवारी (दि. २४) युतीची घोषणा केली. वरळी येथील हॉटेल ब्लू सी याठिकाणी ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीच्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम दिला.
ठाकरे बंधूंची युती होताच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. २७ नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेना सोडताना, “माझा वाद विठ्ठलाशी नाही तर आजुबाजूच्या बडव्यांशी आहे", असे राज ठाकरे म्हणाले होते. तोच संदर्भ घेत शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
वाचा शेलारांची पोस्ट जशीच्या तशी -
घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते "भागीदार"
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार!
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
"लाव रे तो व्हिडीओ" असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार...
"नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?"
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"
शेलारांच्या टीकेवर आता स्वतः राज ठाकरे किंवा मनसेकडून काही प्रत्युत्तर येते का हे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली असून जागावाटपाबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना, यावेळी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असे राज यांनी ठणकावून सांगितले. तर, मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेन त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.