मुंबई : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद मंगळवारी उमटल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि राज्यातील मुली-महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या ३५० ते ४०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७२ जणांना अटक करण्यात आली आहे.
बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली, ती शाळा भाजप, आरएसएसशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. याप्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
बदलापूरमध्ये दुसऱ्या दिवशीही तणाव कायम असून बुधवारी शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू असून जवळपास ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ७०पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी अटक करून त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसरीकडे, बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची बुधवारी जागावाटपावर बैठक होणार होती. मात्र, जागावाटपावरील चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’चा एल्गार पुकारण्यात आला आहे.
महायुती सरकारला सत्तेची गुर्मी चढली आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढले आहे, पण सरकार आपल्यात मस्तीत आहे. ‘लाडकी बहीण’ म्हणून १५०० रुपये देण्यासाठी मोठे इव्हेंट केले जात आहेत. पण बहिणींच्या सुरक्षेकडे सरकारचे लक्ष नाही. बदलापूरच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनतास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्रात महिला, बालकांवर होत असलेल्या अत्याचाराने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. राज्यातील गृह खात्याचे हे सपशेल अपयश आहे. या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, संघटना या बंदमध्ये सहभागी होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.
महिलांवरील अत्याचाराचा वाढता आलेख
महाराष्ट्रातील बालकांविरोधी गुन्हे २०१४ साली ८,००० होते, ते आता २२ हजारांपर्यंत गेले आहेत. महिलांवरील अत्याचार २६ हजारांवरून ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत. हे गंभीर आहे. त्यामुळे यात कोणते राजकारण नसून सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही विरोधक म्हणून मांडणार, असे पटोले यांनी सांगितले.
बदलापूरमध्ये तणाव कायम; इंटरनेट सेवा बंद
बदलापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तणाव कायम आहे. मंगळवारी झालेल्या उद्रेकानंतर बुधवारी काही मोजकीच दुकाने उघडण्यात आली असून, उर्वरित बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.
आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला १७ ऑगस्ट रोजी अटक केली असून बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे बदलापूरमध्ये अजूनही तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे आरोपीच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. आरोपीचे वकीलपत्र घेणार नाही, अशी भूमिका कल्याण बार असोसिएशनने घेतली असून उल्हासनगर, बदलापूर, आणि कल्याण येथील वकिलांनी आंदोलकांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.
उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर मविआचा आक्षेप
बदलापूरमधील घटनेनंतर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ती शाळा भाजपशी संबंधित आणि सरकारी वकीलही त्याच पक्षाचा असल्याने पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार कसा? हे प्रकरण नंतर दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असे सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी करत उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित - मुख्यमंत्री
बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवरील झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर झालेले आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. त्याचा लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे होते आणि बाहेरून गाड्या भरून आंदोलनकर्ते आले होते. यावेळी या आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मंत्र्यांनी पूर्ण केल्या, तरी हे आंदोलक मागे हटायला तयार होत नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मंत्रालयाबाहेर आंदोलन
बदलापूर येथील घटनेचा देशभरातून निषेध केला जात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने बुधवारी भारतमाता सिनेमासमोर सकाळी ११ वाजता जनआंदोलन करण्यात आले. तर काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. नंतर पोलिसांनी वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांना ताब्यात घेतले. निदर्शकांनी ‘शिंदे सरकार, हाय हाय’, अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून सोडला होता.
शाळेवर प्रशासकाची नियुक्ती - केसरकर
बदलापूरातील शाळेत झालेला प्रकार हा अतिशय घृणास्पद होता. या प्रकारात झालेली दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती, ती पूर्ण झालेली आहे. आता या शाळेचा ताबा प्रशासक घेतील, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ठाण्यातील उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित या प्रशासक म्हणून काम पाहतील. तसेच राजकुमार जाटकर आणि विश्वनाथ पाटील हे सल्लागाराच्या भूमिकेत असतील.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचे नियम
१) शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक
२) शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे. त्यांची काटेकोर तपासणी करणे गरजेचे.
३) नियमित कर्मचाऱ्यांसह बाह्यस्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात, त्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक अशा संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी काटेकोर तपासण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची.
४) शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
५) राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करावी.
६) शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात येणार.
७) प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सर्वांना पोलीस पडताळणी बंधनकारक.
८) शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार.
महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार ही लाजिरवाणी गोष्ट
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचार होत आहेत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली. “बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्यावर झालेला अत्याचार हा निंदनीय आहे. अशा घटनांमध्ये न्याय मिळत नसल्याने न्यायासाठी लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते. जोपर्यंत आरोपी विरोधात खटला दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवावे लागते. गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबियांना पोलीस ठाण्यात का जावे लागते, आधीच का गुन्हा दाखल केला जात नाही,” असे सवाल राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर उपस्थित केले आहेत.
वामन म्हात्रेंविरुद्ध गुन्हा दाखल
एका महिला पत्रकाराविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वामन म्हात्रे यांच्याविरोधात भादंविच्या तसेच अॅट्रॉसिटीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण पूर्वचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.