

नुकतेच माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०२५ मधील त्यांचे आवडते पुस्तक, आवडता चित्रपट आणि आवडत्या गाण्यांची यादी सोशल मीडियाद्वारे शेयर केली आहे. ओबामांच्या ‘फेव्हरेट सॉंग्स २०२५ ’ च्या यादीत मराठमोळे ‘पसायदान’ चा समावेश आहे. याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-आध्यात्मिक परंपरेची खोली आज पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०२५ मधील त्यांच्या आवडत्या गीतांमध्ये गायिका गणव्या यांनी सादर केलेले 'पसायदान' समाविष्ट केले आहे.
पुढे ते म्हणाले, "यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या काळातीत प्रार्थनेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. करुणा, न्याय आणि भेदांच्या पलीकडे जाणारी ही आर्त साद जागतिक पातळीवर पोहोचत आहे, याचा विशेष आनंद वाटतो. संघर्ष आणि ध्रुवीकरणाने ग्रासलेल्या आजच्या जगाला महाराष्ट्राचा हा आध्यात्मिक विचार नक्कीच दिशादर्शक ठरेल."
दरवर्षी आपल्या आवडत्या पुस्तकं, चित्रपट आणि संगीताची यादी शेअर करण्याची परंपरा ओबामा यांनी त्यांच्या व्हाइट हाऊसमधील कार्यकाळात सुरू केली होती. २०२५ च्या अखेरीस जाहीर झालेल्या या यादीत ‘पसायदान’चा समावेश होणे ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विचारसरणीला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.