
बारामती शहरात एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसराला हादरवून टाकलं आहे. रविवारी (२७ जुलै) बारामतीच्या मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. या अपघाताच्या धक्क्यातून सावरायच्या आधीच अवघ्या २४ तासांच्या आतच आज (२८ जुलै) सकाळी मुलींच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचे निधन झाल्याने बारामतीमध्ये शोककळा पसरली आहे.
डंपरच्या धडकेत वडील व दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
रविवारी सकाळी ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलींना, ४ वर्षांची मधुरा आणि १० वर्षांची सई यांना घेऊन बाजारात फळं आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी थेट डंपरच्या चाकाखाली गेली आणि तिघेही गंभीर जखमी झाले. ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर हॉस्पिटलला नेताना मुलींचाही मृत्यू झाला.
धक्क्यातून आजोबांचा मृत्यू; संपूर्ण कुटुंब उध्वस्त
या घटनेची माहिती मयत ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांना मिळताच ते हादरून गेले. राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक असून, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी ओंकार मुलींना घेऊन फळ आणण्यासाठी गेले होते. मात्र, आपल्या मुलाचा आणि दोन नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना तीव्र मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोवरच २४ तासांच्या आधीच आज पहाटे त्यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या हृदयद्रावक घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली. त्यांनी म्हटले, ''बारामती येथील खंडोबानगर येथे काल झालेल्या भीषण अपघातात ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुली सई आणि मधुरा यांचे निधन झाल्यानंतर आज ओंकार यांचे वडील आणि सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचे निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या निधनामुळे आचार्य कुटुंबियांवर कोसळलेल्या अपार दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.''
संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.