बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

बारामतीतील प्रतिष्ठेच्या बनलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.
बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व
बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व
Published on: 

पुणे : बारामतीतील प्रतिष्ठेच्या बनलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या निवडणुकीची चर्चा रंगली होती. पवार विरुद्ध पवार तसेच पवार विरुद्ध पुरुषोत्तम जगताप असा सामना या निवडणुकीत रंगला होता. तथापि, या संघर्षात सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने २१ पैकी २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांच्या पॅनलला मान वर काढण्याची सुद्धा संधी दिलेली नाही.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि युगेंद्र पवार यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला आहे. युगेंद्र पवार यांच्या पॅनलकडे शरद पवार यांचे पॅनल म्हणून पाहिले जात होते. पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक महत्वाची बनली होती.

अजित पवारांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक

अजित पवारांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातली ही पहिलीच निवडणूक होती. ही निवडणूक सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सिद्ध करणारी होती. त्यामुळे जय पवार आणि सुनेत्रा पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरत होते आणि त्यांचा त्यांना यश मिळाले. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, राज्यातील उच्चांकी दर देणारा कारखाना अशी याची ओळख. या कारखान्याची निवडणूक देखील तितकीच प्रतिष्ठेची आणि रंगतदार झाली.

लक्ष्मीदर्शनाचा मोठा वापर केल्याचा आरोप

आता निकालानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी मोठा आरोप केला आहे. ‘पराभव आम्ही स्वीकारतो. जनमताचा आदर केला पाहिजे’, असे ते म्हणाले. पण त्याचवेळी पुरुषोत्तम जगताप यांनी लक्ष्मीदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला असा आरोप केला. ‘मी यापूर्वी वेगळा पॅनल करण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन उपद्रवी लोकांचा त्या पॅनेलमध्ये समावेश होता’, असे ते म्हणाले. पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत हे पॅनल उभे केले होते. राष्ट्रवादीतून त्यांचे निलंबन झाले आहे. ‘निलंबन केले ठीक आहे.आता शेतकऱ्यांसाठी काम करत राहू. शेवटच्या दोन दिवसांमध्ये ही चक्रे फिरली. पुढे कोणत्याही पक्षात जाणार नाही’, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in