बार्शीत धक्कादायक घटना; आईने घेतला गळफास, १४ महिन्याच्या चिमुकल्यालाही दिलं विष, बाळाची प्रकृती गंभीर

बार्शी तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. वाणी प्लॉट परिसरात २५ वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्या १४ महिन्यांच्या बाळाला आधी विष पाजले. त्यानंतर स्वत: घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
बार्शीत धक्कादायक घटना; आईने घेतला गळफास, १४ महिन्याच्या चिमुकल्यालाही दिलं विष, बाळाची प्रकृती गंभीर
Published on

बार्शी तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. वाणी प्लॉट परिसरात २५ वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्या १४ महिन्यांच्या बाळाला आधी विष पाजले. त्यानंतर स्वत: घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.

मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे (वय २५) असे आहे. तर तिच्या मुलाचे नाव अन्विक वैभव उकिरडे (वय १४ महिने) असे आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.

अंकिताचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्यासोबत झाले होते. घटनेच्या दिवशी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता ही मुलासह घरात एकटीच होती. नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या महिलेने घरात कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहिले असता, अंकिताने गळफास घेतलेले धक्कादायक दृश्य तिला दिसले. तर, लहान अन्विक बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला होता. महिलेने आरडाओरडा करून नातेवाईक व शेजाऱ्यांना बोलावले.

बाळाचा जीव वाचला; मात्र प्रकृती गंभीर

अन्विकला तातडीने बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर सध्या त्याला पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची स्थिती गंभीर असून उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

अंकिताने टोकाचे पाऊल का उचलले?

अंकिता हिने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक व मानसिक ताणतणावांच्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. नुकतीच बार्शी शहरात एका विवाहितेची विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यावरून हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in