बारसू आंदोलन चिघळणार? पोलिसांनी घेतले विनायक राऊतांना ताब्यात; उदय सामंतांचा इशारा

रिफायनरी विरोधात बारसू येथे सुरु असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या खासदार विनायक राऊतांना घेतले ताब्यात...
बारसू आंदोलन चिघळणार? पोलिसांनी घेतले विनायक राऊतांना ताब्यात; उदय सामंतांचा इशारा

कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या बारसू येथील आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकल्पावरून वाद सुरु असताना आज कोकणातील खासदार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे आंदोलकांची भेट घेण्यास बारसू येथे जाणार होते. पण, पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून ताब्यात घेतले आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे आंदोलकांना भेटण्यासाठी मुंबईहून बारसूकडे रावण झाले होते. यापूर्वी पोलिसांनी त्यांना बारसू येथे जाऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी रस्त्यावरच आपले ठाण मांडले होते. तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच, रिफायनरीचे सर्वेक्षण सुरु असताना आंदोलक त्याठिकाणी आले. यावेळी तिथे मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सुरु असलेल्या वादावरून आणि विनायक राऊत यांच्या अटकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत आणि विनायक राऊत या दोघांवर टीका केली. मंत्री उदय सामंत म्हणाले की, "प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली राजकारण करू नका. दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे," अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, "विनायक राऊतांनी कलम १४४चे उल्लंघन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in