मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (इलेक्ट.) व ३ वर्षे विधी या दोन अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. बीएड आणि एलएलबी ३ वर्षे सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीएड सीईटी परीक्षा २७ ते २९ मार्च तर विधी ३ वर्षे परीक्षा १ ते २ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे.
सीईटी सेलने आजपर्यंत एमपीएड, एमएड, एमसीए, एम. एचएमसीटी, बीएड व विधी या सहा अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीस सुरुवात झाली असून उर्वरित इतर अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीस लवकरच सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.
नोंदणीसाठी अपार, यूडी आयडी बंधनकारक
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे, यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने या वर्षीपासून सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी) बंधनकारक करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व यूडीआयडीची नोदणी करावी लागणार आहे.