

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगावचे उपसरपंच वैजनाथ विठ्ठल लाटे यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भोपा-बाभळगाव रस्त्यावर ही घटना घडली असून, लाटे यांचा मृत्यू अपघातात झाला की यामागे घातपात आहे, या दोन्ही शक्यतांच्या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २५) रात्री वैजनाथ लाटे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना हा प्रकार घडला असावा. बुधवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास काही स्थानिक तरुणांना भोपा-बाभळगाव रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात लाटे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शेजारीच दुचाकी अत्यंत गंभीर अवस्थेत मोडतोड झालेली दिसून आली. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा केवळ रस्ता अपघात आहे की यामागे घातपात आहे, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच लाटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
वैजनाथ लाटे हे बाभळगावच्या ग्रामपंचायत आणि सामाजिक कारभारात सक्रिय होते. त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.