''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

वरळी डोम परिसरात आज सकाळपासून मराठी अस्मिता जागवणारा जल्लोष पाहायला मिळत आहे. २० वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित यांसारखे कलाकारही मंचावर उपस्थित राहिले असून त्यांनी मराठी भाषेच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली.
''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल
PM
Published on

वरळी डोम परिसरात आज सकाळपासूनच मराठी अस्मितेचा जागर पाहायला मिळत आहे. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमिलन या मेळाव्याच्या निमित्ताने झाले. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे व ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्तेच नाही तर मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज कलाकारांनीही आपली उपस्थिती लावली आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदी कलाकार मंचावर हजर आहेत. त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आपली ठाम भूमिका मांडली.

भरत जाधव यांचा संतप्त सवाल

या कार्यक्रमाला उपस्थित राहताना भरत जाधव म्हणाले, ''ठाकरे बंधू दोघं एकत्र येण्याची वाट मी पण पाहत होतो. मराठी हा मोठा मुद्दा आहे. तर, आम्हाला वाटतं प्रत्येकाने स्वत: हून इथे येऊन हजर राहणं गरजेचे आहे. मराठी माणसाने जागं व्हायला हवं. मराठीपणा जपायला हवा. मी असं म्हणत नाही, की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. तीही चांगली आहे. पण ती सक्तीची नको. हाच तर मुद्दा होता.''

उद्योगपती सुशील केडियाने मराठी शिकणार नसल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर भरत जाधव यांनी सुशील केडियाचा निषेध करत म्हंटले, ''लाज का वाटते? जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली आहे तुम्हाला? मग अभिमानाने सांगता कशाला ३० वर्ष मी इथे राहतोय?'' आपल्या मिश्किल स्वभावाने हसत भरत जाधव यांनी म्हंटले, ''मला वाटतं ३० वर्ष संपत आले आहेत का त्यांचे? इथेच तुम्ही Devlop करताय, व्यवसाय करताय. मराठी माणसांवर राज्य करताय, तर त्यांनाच लांब करताय? चुकीची गोष्ट आहे. याचा मी निषेध करतो. दोन्ही ठाकरे यांनी असच एकत्र राहावं का? या सवालावर भरत जाधव म्हणाले, तसे झालं तर चांगली गोष्ट आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याने आपला आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे? माहीत नाही. मी माझ्यापुरते वैयक्तिक बोलू शकते. संपूर्ण महाराष्ट्रांमध्ये जे दृश्य बघायला आम्ही असुसलेले होतो वर्षानुवर्ष; ते दृश्य आज आम्हाला मंचावर दिसणार आहे.''

मदतीसाठी अनेक कलावंत राज ठाकरे यांना भेटायला येतात मग अशा वेळी जेव्हा राज ठाकरे आवाहन करतात तेव्हा मराठी कलाकार येताना दिसत का नाहीत? असा सवाल तेजस्विनीला केला असता, ती म्हणाली ''मलाही हा प्रश्न पडलाय. इतर वेळा जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि मराठीचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही का एकत्र येत नाही? हे दुर्दैवी आहे.''

पुढे ती म्हणाली, ''मराठीचा विजय साजरा करण्यासाठी मी इथे आली आहे. अजून खूप मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. सर्वात आधी काय झालं पाहिजे? महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे आणि मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. हे जे वातावरण बिघडलं आहे, त्याची काहीच गरज नाही. कारण आम्ही हिंदी विरोधात नाही सक्ती विरोधात होतो. मी फक्त दोन कारणांसाठी आले आहे. ठाकरे बंधूना एकत्र पाहायला आणि विजय साजरा करायला.''

logo
marathi.freepressjournal.in