पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप - राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; लांडगे विरुद्ध अजित पवार संघर्ष उफाळला

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत 'विकास आम्ही करतो, नाव दुसऱ्याचं लागतं' अशा शब्दांत टीका केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप - राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; लांडगे विरुद्ध अजित पवार संघर्ष उफाळला
Published on

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत 'विकास आम्ही करतो, नाव दुसऱ्याचं लागतं' अशा शब्दांत टीका केली. तर ''लांडगे यांची भाषा तमाशातील फडासारखी होती'' असे म्हणत या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प, संतसृष्टी, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाच्या लोकार्पणावेळी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, ती कामं प्रत्यक्षात भाजपच्या कार्यकाळात पूर्ण झाली," असा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला.

कार्यक्रमांतील राजशिष्टाचारात बदल -

"यापुढे जेव्हा एखाद्या विकासकामाचं भूमिपूजन किंवा लोकार्पण होणार असेल, तेव्हा त्या कामाच्या निविदेची तारीख देखील स्पष्टपणे नमूद करावी. तसेच, उद्घाटनाच्या कार्यक्रमांतील राजशिष्टाचारात बदल करून पालकमंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य राहणार नाही, याबाबतही विचार केला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, थेट उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत म्हटलं, "मी पैलवान आहे. कोणालाही घाबरत नाही. कोणी अंगावर आला, तर त्याला अंगावर घ्यायची सवयच आहे." अशी उघड टीका केली.

पैलवान असले तरी वस्ताद अजितदादाच - उमेश पाटील

तर, या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील थेट शहरात दाखल झाले आणि त्यांनीही लांडगेंवर जोरदार शब्दबाण सोडले. "पैलवान असले तरी वस्ताद अजितदादाच आहेत", अशा शब्दांत त्यांनी लांडगेंना टोला लगावला. तसेच, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच शहराचा विकास झाला, असाही दावा त्यांनी केला.

''पिंपरी चिंचवड शहर आणि परिसराला संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. अशा पवित्र व्यासपीठावर, ज्यांनी स्वतःला राजकारणात आणलं, अशा ज्येष्ठ नेत्यांवर टीका करणे योग्य ठरते का?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

"अशा मंचावर काय बोलावं आणि कशी भाषा वापरावी, याचे भान आमदार महेश लांडगे यांना राहिले नाही. तमाशाच्या फडात जसं बोललं जातं, तशा पातळीवर त्यांनी वक्तव्य करून स्वतःचीच प्रतिष्ठा घसरवली आहे. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचे स्पष्टपणे दिसते," अशी तीव्र टीका पाटील यांनी केली.

दरम्यान, या संपूर्ण वादातून भाजपचा स्वबळाचा सूर पुन्हा स्पष्टपणे उमटला आहे. चार आमदारांच्या बळावर भाजप पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी देखील स्वबळाचा आग्रह कायम ठेवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र युतीसाठी आशावादी भूमिका घेऊन वाट पाहात आहे.

logo
marathi.freepressjournal.in