
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर सुरू झाली आहे. न्यायालयाने तीन महिन्यात निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी आपल्या पक्षांची नव्याने मांडणी करत निवडणूक रणनिती आखत आहेत. आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीत पुन्हा एकत्र लढणार का? की मुंबई वगळून एकत्र लढणार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे.
आज बारामती येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्र लढतील का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता निवडणूक लांबवता येणार नाहीत. येत्या तीन महिन्यात निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू होतील. आमचा निर्णय झालेला नाही. तशी आम्ही अद्याप औपचारिक चर्चा केलेली नाही. पण, आमची एकत्रित निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे कॉँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि आमचा पक्ष असे आम्ही एकत्रित मिळून निवडणुकीसंदर्भात चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ.''
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भूमिका -
तर, पुढे त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, अद्याप महाविकास आघाडीमध्ये मुंबईसाठी कुठलीही ठोस चर्चा झालेली नाही. मात्र, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईत शक्तीस्थान आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागेल,” असे पवार म्हणाले.
हिंदी भाषा सक्तीने नाही - पवार यांची स्पष्ट भूमिका
राज्यात हिंदी तिसरी भाषा म्हणून सक्तीने लागू करण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, “हिंदी ऐच्छिक असावी. ५०–६०% लोक बोलतात म्हणून ती सर्वांवर लादता येणार नाही. पण, ती दुर्लक्ष करणे हितावह नाही. ज्याला जे हवं आहे त्याने ते करावं. कुणी स्वत:हून शिकत असेल त्याला शिकू द्यावं. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. संपूर्ण देशात ५०-६०% लोकं हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद करण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये'' अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.