
पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ असे नेहमीच म्हटले जाते. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या सुसंस्कृत प्रतिमेला शनिवारी गालबोट लागले. एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आपली बीएमडब्ल्यू कार थेट रस्त्यातच उभी करत सिग्नलवरच लघुशंका केली. स्थानिकांनी या युवकाला हटकल्यानंतर युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर गौरव मनोज अहुजा नावाचा हा तरुण फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र नावावर कार नोंदणी असलेल्या त्याच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकातील शास्त्रीनगरच्या पुढे येरवडा पोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावर हा प्रकार घडला. मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला त्याचा मित्र भाग्येश निबजीया ओसवाल बसलेला होता. या दोघांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गौरव अहुजा अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
त्याचा मोबाइल सकाळपासून बंद असून, त्याच्या घरच्यांकडूनही गौरवचा शोध घेतला जात आहे. पुणे शहराचे नाव बदनाम करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे. “गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. गौरवने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. गौरवचा मोबाइलच सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी कारवाई होईल, ती मला मान्य आहे,” असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. “तरुण अल्पवयीन नाही. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तरुणाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केल्यावर समोर येईल. पण व्हिडीओत बिअरची बॉटल दिसत असल्याने त्या पार्श्वभूमीवर काही कलमे लावण्यात आलेली आहेत,” अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
आरोपी व्यक्तीचे घर, त्यांचे काही नातेवाईक, पुण्याच्या बाहेरील त्यांची काही मित्रमंडळी यांच्याकडे त्यांचा शोध घेतला जात आहे. मुलांनी कुठे पार्टी केली होती का? याबद्दल माहिती मिळाली नाही, पण तपास केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
क्रिकेट सट्टेबाजी, खंडणीचे गुन्हे दाखल
गौरव अहुजा आणि त्याचे वडील मनोज अहुजा यांच्यावर यापूर्वी क्रिकेट सट्टेबाजी, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांना यापूर्वी अटकदेखील झालेली होती. गौरव अहुजा याच्या तीन पिढ्यांनी बेकायदेशीर लॉटरी व्यवसाय केला असून त्यातून पैसा मिळवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. एका सट्टेबाजी प्रकरणात आरोपीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचवेळी गौरव हा ऑनलाइन बेटिंगचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
माझ्या मुलाची मला लाज वाटते - वडील
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी हॉटेल व्यावसायिक मनोज अहुजा यांना ताब्यात घेतले. या घटनेबाबत आरोपीचे वडील मनोज अहुजा म्हणाले की, “माझ्या मुलाने केलेले कृत्य निषेधार्थ असून त्याच्या कृत्यामुळे आमची बदनामी झाली आहे. गौरव हा माझा मुलगा असल्याची मला लाज वाटत असून त्याने चौकातील सिग्नलवर नव्हे, तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे.”
गौरव अहुजाच्या हॉटेलबाहेर आंदोलन
पुण्यातील या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून आरोपींवर कठोर करावाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव अहुजा याचे स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात ‘क्रीम किचन’ नावाने बिअर बार हॉटेल आहे. त्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी गौरव अहुजा याच्या फोटोला जोडे मारून आणि त्याचा फोटो जाळण्यात आला. यावेळी हॉटेलमध्ये काही लोक दारू पीत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केली.