

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात गुरुवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास घडलेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली. काही वेळातच त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांत, साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात एका रात्रीत भीषण रक्तरंजित हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे.
लता सुभाष डुकरे (वय ५५) आणि सुभाष दिगंबर डुकरे (वय ६०) असे मृत आई-वडिलांचे नाव असून विशाल सुभाष डुकरे (वय ३५) असे मुलाचे नाव आहे.
गाढ झोपेतच मुलाने घेतला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डुकरे हा गेल्या काही काळापासून दारूच्या व्यसनात सापडला होता. बुधवारी रात्री उशिरा तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. घरात गाढ झोपलेल्या आई-वडिलांवर त्याने कुऱ्हाडीने वार केले. डोक्यावर आणि मानेवर वार झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. आई-वडिलांचा जीव घेतल्यानंतर विशालने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली.
एका घरातील तिन्ही सदस्यांचा एकाच रात्रीत झालेला अंत पाहून गावात शोककळा पसरली. घटना समोर येताच नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवली. चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार दारूच्या व्यसनामुळे मानसिक असंतुलन निर्माण होऊन ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे.
रायगडमध्येही दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार
दोन दिवसांपूर्वी रायगडमधील मेंदडी गावातही अशाच प्रकारे घटना घडली. कौटुंबिक वादातून दोन मुलांनीच घरखर्च देत नाहीत आणि घरात राहू देत नाहीत या रागातून स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेत महादेव कांबळे (वय ७०) आणि विठाबाई कांबळे (वय ६५) यांची हत्या करण्यात आली होती.