सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा! प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा तसेच अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे.
सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा! प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी
Published on

प्रतिनिधी/मुंबई

राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर आणि दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा तसेच अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. त्यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करून महिलांची बदनामी केली आहे, अशी तक्रार लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुनगंटीवार यांनी चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला खीळ घालणारा आहे. त्यांची कृती केवळ आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी नसून लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करावी. तसेच त्यांच्यावर आणि भाजपवर निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in