

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात सोमवारी दुपारी भरधाव कार डंपरच्या मागील भागात घुसून झालेल्या भीषण अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. महिलेला एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे अधिक उपचारासाठी पाठवले आहे.
कल्याण राहणारे लिसी बालन व मुलगा निकेश बालन हे मुंबई-गोवा महामार्गावर भुयारी महामार्गावरून मुंबईकडे निघाले होते. भरधाव कार अनियंत्रित झाल्याने ती पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागात घुसली. या अपघातात कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाल्याने कशेडी पोलिसांनी दोघांनाही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र मुलगा निकेश बालन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आई लिसी बालन हिला गंभीर दुखापत झाल्याने आधी उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे पाठवण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती समजताच कशेडी पोलीस मदत केंद्राची पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पो.हेकाँ. केदार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातानंतर काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते, लक्ष्मण कळंबे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. क्रेनच्या साह्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.