

मुंबई : प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे कोकणासाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल आणि चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनामार्फत विविध गाड्या चालविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार या सेवांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार आणखी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीच्या ४ सेवांचा समावेश आहे. गाडी क्रमांक ०११००३ विशेष गाडी १६ आणि १९ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालविण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०१००४ विशेष गाडी १५ आणि १८ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबा देण्यात येणार आहे.
गाडीची संरचना ३ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी असणार आहे. तसेच पनवेल- चिपळूण-पनवेल मेमू अनारक्षित विशेष ३० सेवा चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ मेमू अनारक्षित विशेष गाडी १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पनवेल येथून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. या गाडीच्या १५ सेवा चालविण्यात येतील, तर गाडी क्रमांक ०११६० मेमू अनारक्षित विशेष गाडी १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत चिपळूण येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीच्या १५ सेवा चालविण्यात येतील, तर मेमू सेवा १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत चालवल्या जाणार नाहीत.
गाडी क्रमांक ०१००३ साठीचे आरक्षण ८ सप्टेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.