Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना
Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचनाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाण्याचं तिकीट हातात आहे म्हणून अगदी शेवटच्या क्षणी रेल्वे स्थानक गाठण्याचा विचार करत असाल, तर तो बदललेलाच बरा! गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. गाडी सुटण्याच्या किमान ३० मिनिटं आधी स्थानकावर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेकडून २६२ विशेष फेऱ्या

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने यंदा एकूण २६२ विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. त्यात २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित विशेष फेऱ्यांचा समावेश आहे. आरक्षित विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी बुकिंग केलं आहे.

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना
Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांच्या माहितीनुसार, २०० आरक्षित फेऱ्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ फेऱ्या असतील. या सेवा ९ सप्टेंबर २०२६पासून सुरू होणार असून मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणातील विविध ठिकाणांसह गोव्यासाठी गाड्या धावतील. आरक्षित सेवांमध्ये वातानुकूलित गाड्यांसह एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांची मिश्र रचना असलेल्या गाड्यांचाही समावेश आहे.

३० मिनिटं आधी स्थानकावर पोहोचा

गणपतीच्या काळात प्रमुख स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या किमान ३० मिनिटं आधी स्थानकावर पोहोचावं, असं मध्य रेल्वेने सांगितलं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येईल आणि गाडीत चढतानाही गैरसोय होणार नाही.

गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेची विशेष तयारी

गणेशोत्सवातील अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत. गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये यासाठी निवडक स्थानकांवर 'होल्डिंग एरिया'ची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष गाड्यांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने प्रवाशांना चढता यावं यासाठी रांग व्यवस्थापनही केलं जाणार आहे.

सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) जवान आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने निवडक ठिकाणी पिण्याचं पाणी, भोजन आणि स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना
२४६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा; १८४ मिश्र विशेष गाड्या, ६२ अनारक्षित विशेष गाड्या

तिकीट आणि ओळखपत्र विसरू नका

प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट आणि आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावं, असंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

गणपती विशेष गाड्यांच्या वेळा, मार्ग आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळावर तसेच NTES ॲपवर मिळू शकते. अनारक्षित डब्यांची तिकिटं नेहमीच्या दराने UTS प्रणालीद्वारे बुक करता येतील. तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲपचाही वापर करता येणार आहे.

त्यामुळे यंदा गणपतीला कोकणात निघत असाल, तर तिकीट बुक करण्यासोबतच स्थानकावर वेळेआधी पोहोचण्याचं नियोजनही करा. लाखोंच्या गर्दीत शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in