

नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गावागावात निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच राजकारणात आता नवे समीकरण पाहायला मिळत आहे. कधीही न विचार केलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये काका-पुतण्यांचे दोन गट निर्माण झाले. अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यावर त्यांच्यातील एकत्रिकरणाच्या रेषा पुसट झाल्या. मात्र, नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे हे दोन गट एकत्र येताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती झाली आहे. या युतीची मध्यस्थी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली असून, या संयुक्त आघाडीची अधिकृत घोषणा चंदगडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
चंदगड नगरपंचायतीमध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील आणि शरद पवार गटाच्या नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार गटाने या आधीही राज्यात भाजपसोबत कोणतीही युती करणार नाही, हे स्पष्ट सांगितलं आहे. अजित पवार मात्र महायुतीत असून सत्तेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर ही नगरपंचायत निवडणूक चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.
भाजपच्या दुर्लक्षामुळे युती
मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत स्पष्ट केलं की, भाजप स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला दुर्लक्षित करत असेल, तर आमचं संघटन मजबूत ठेवण्यासाठी स्थानिक हिताचं राजकारण करणं आवश्यक आहे.
काँग्रेस देखील आघाडीत येणार?
चंदगडमध्ये विधानसभा निवडणुकीत बाभुळकर आणि पाटील एकमेकांचे विरोधक होते. मात्र, आता 'राजर्षी शाहू विकास आघाडी' स्थापन करून दोघेही एकत्र आले आहेत. काँग्रेसही या आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात अशी आणखी युती होऊ शकते?
राष्ट्रवादीची अशी युती होणे चंदगड हे पहिलं उदाहरण आहे. या आधी बीडमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे भाजपने डावलल्यास पक्षाच्या हितासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखी ठिकाणीही अशीच समीकरणं जुळणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरले आहे.