

राज्यात शेतकरी कर्जबाजारीपणाने होरपळत असतानाच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकारी कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचा गंभीर दावा केला आहे. या प्रकरणावर मंगळवारी (१६ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
हे सरकारसाठी अत्यंत लाजीरवाणं
रोहित पवार म्हणाले, “सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागत असेल, तर हे सरकारसाठी अत्यंत लाजीरवाणं आहे. संबंधित सावकारावर कठोर कारवाई झाली पाहिजे."
शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा
पुढे ते म्हणाले, "सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा अशा घटना वाढल्यास मानवी अवयवांच्या व्यापाराला पोषक वातावरण निर्माण केल्याचा ठपका सरकारवर ठेवावा लागेल,” असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला.
नेमकं प्रकरण काय?
रोशन कुडे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एका सावकाराकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र जनावर दगावल्याने व्यवसाय अडचणीत आला आणि कर्जाचे हप्ते थकले. यानंतर सावकाराने चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारण्यास सुरुवात केली. काही काळातच, १ लाख रुपयांचे कर्ज तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे कुडे यांनी सांगितले.
कर्ज फेडण्यासाठी कुडे यांनी आपली शेती आणि मोटारसायकल विकली, तरीही कर्ज फिटले नाही. यानंतर सावकाराने थेट किडनी विकण्याचा सल्ला दिल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यानुसार आधी कोलकाता आणि नंतर कंबोडियाला जाऊन ८ लाख रुपयांना किडनी विकल्याचा दावा कुडे यांनी केला आहे.
या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील सावकारी, शेतकरी कर्जबाजारीपणा आणि सरकारी धोरणांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.