

नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी (दि. १८) सकाळी एक भीषण अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अस्तंबा यात्रेवरून परतणारी पिकअप गाडी घाटात उलटल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील काही भाविकांचा समूह अस्तंबा यात्रेसाठी गेला होता. यात्रा संपवून ते चांदशैली घाटातून पिकअप गाडीतून परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तीव्र वळणावर गाडी दरीकडे उलटली आणि क्षणातच भीषण अपघात झाला. पिकअपच्या मागच्या भागात बसलेले अनेक प्रवासी वाहनाखाली दबले गेले, तर काही जण रस्त्यावर फेकले गेले.
अपघात एवढा भीषण होता की, ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू करून जखमींना पिकअपमधून बाहेर काढले. अपघातानंतर परिसरात एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला होता. काही प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, घाटातील अरुंद रस्ता व वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा. वाहन अतिवेगात असल्याची शक्यता देखील तपासात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अस्तंबा यात्रेतून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.