छत्रपती संभाजीनगरमध्ये तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या

राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) एकाचवेळी बदल्या करून प्रशासनात मोठी खळबळ उडवली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या
Published on

सुजीत ताजणे / छत्रपती संभाजीनगर

राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) एकाचवेळी बदल्या करून प्रशासनात मोठी खळबळ उडवली आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विनय गौडा जी. सी. नवे जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अकोला येथील बीज महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विनय गौडा जी. सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आदेशात जिल्हाधिकारी पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून ही बदली केल्याचे नमूद केले आहे. २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले गौडा ऑक्टोबर २०२२ पासून चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्नाटक येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासन सेवेत प्रवेश केला. सातारा जिल्हा परिषदेत सीईओ तसेच नंदुरबार येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

अमोल येडगे मनपा आयुक्तपदी

अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले येडगे उत्तम प्रशासक आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. कराड येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या येडगे यांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण केले. हिंगोली व नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, तर बीड आणि अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उपक्रमांमध्ये त्यांनी प्रभावी प्रशासनाची छाप पाडली असून, सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांना राज्य शासनाचा विशेष पुरस्कारही मिळाला आहे. ते संभाजीनगर मनपाचे ३१ वे आयुक्त ठरणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या
२५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल

जि.प. सीईओपदी मिन्नू पी. एम.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिन्नू पी. एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सीईओ अंकित यांची नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मिन्नू पी. एम. या केरळ राज्यातील असून त्यांनी २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा १५० व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पोलिस विभागात लिपिक म्हणून काम करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि सहा वर्षांच्या मेहनतीनंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या
मुंबई महापालिकेत ‘महिलाराज’; महापौर, आयुक्त ते समिती अध्यक्षपदावर महिलांचेच वर्चस्व

पहिल्यांदाच तिन्ही पदांवर एकत्र बदल्या

२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि जि.प. सीईओ अंकित या तिन्ही अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या झाल्याने प्रशासनात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. नवीन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त म्हणून अमोल येडगे आणि जि.प. सीईओ म्हणून मिन्नू पी. एम. आता जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in