

आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी परिसरात एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी (दि.७) दुपारी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सध्या परिसरात शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी एआयएमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जलील हे कार्यकर्त्यांसह बायजीपुरा भागात गेले होते. त्यावेळी एका प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या गटाने अचानक जलील यांच्या दिशेने धाव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी, परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच जलील आपल्या वाहनात बसले. मात्र, उपस्थित जमावाने वाहनावर ठोसे मारण्यास सुरुवात केली आणि वाहनाच्या मागे धावत जात हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे घटनेच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सध्या परिसर पूर्णपणे शांत
माहितीनुसार, प्रचारादरम्यान सुरुवातीला काही जणांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यानंतर जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात आली. जमावात ३० ते ३५ जण होते. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या परिसर पूर्णपणे शांत आहे.”
अशा लोकांना आम्ही कधीच...
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी संबंधित प्रतिस्पर्धी उमेदवारावर गंभीर आरोप केले. “त्या उमेदवाराचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय आहेत. मुलांसाठी असलेले रेशन इतर राज्यात पाठवले जाते. अशा लोकांना आम्ही कधीच पक्षात घेतले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुणाला पाठिंबा दिला होता, याची चौकशी झाली पाहिजे,” असे जलील म्हणाले.
पोलिसांना परिस्थिती हाताळता येत नसेल तर...
“मी प्रचारासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. पोलिसांना परिस्थिती हाताळता येत नसेल तर त्यांनी तसे सांगावे. आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवू इच्छितो. आम्ही पुन्हा त्या भागात प्रचार रॅली काढू. मोजके गुंड आम्हाला रोखू शकत नाहीत,” असे जलील यांनी स्पष्ट केले.