

मुंबई : नीट पेपरफुटी आणि ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात राज्यात सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गृह विभागाला यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यानुसार संबंधित न्यायालयाची आवश्यक परवानगी घेऊन हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. गृह विभागाला विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार, सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीकडून हे गुन्हे मागे घेण्याबात संबंधित न्यायालयाला विनंती केली जाणार आहे.
नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाचे लोण राज्यात पसरले होते. राज्यात मुंबईसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर अनेकांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती.