'आदर करतो पण...'; मविआच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोन येऊनही कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढणार

चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या नाना काटेंना उमेदवारी जाहीर झाली, तर राहुल कलाटेंनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला
'आदर करतो पण...'; मविआच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोन येऊनही कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढणार
Published on

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत दिसणार असून राहुल कलाटे यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने महाविकास आघाडी चांगलीच अडचणीत सापडली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी सचिन अहिर यांना त्यांच्याकडे पाठवले होते. उद्धव ठाकरेंशीही राहुल कलाटेंचे बोलणे झाले होते. तरीही, त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावेळी राहुल कलाटेंनी माध्यमांसमोर आपल्या भावना स्पष्ट करत अर्ज मागे घेणार नसल्याचे जाहीर केले.

हेही वाचा :

कलाटेंची समजूत काढायला गेले सचिन अहिर, उद्धव ठाकरेंशी करून दिली चर्चा

राहुल कलाटे म्हणाले की, "उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह विविध पक्षातील काही नेत्यांनी मला माघार घेण्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क केला. मी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. पण, चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच आवडली नसती. म्हणूनच त्यांच्यातून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात मी लढले पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळेच मी या निवडणुकीला सामोरे जात आहे" असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "त्यावेळेस भाजपची प्रचंड लाट असताना तब्बल १ लाख १२ हजार लोकांनी मला मतदान करून निवडून दिले होते. याच लोकांचा आज मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह होता. “प्रत्येकाचे मत एकच होते की, 'राहुल तू लढले पाहिजे' तू नेत्यांचे ऐकत असताना आमचा अनादर करू नको. या लोकभावनेचा आणि पाठिंब्याच्या बळावरच मी ही निवडणूक लढवत आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in