CJI अवमान प्रकरण : शरद पवार गटाचे संविधान सन्मान आंदोलन; रोहित पवार म्हणाले, ''मनुवादी प्रवृत्ती...

न्यायव्यवस्थेचा अवमान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगर आणि बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान सन्मान आंदोलन केले.
CJI अवमान प्रकरण : शरद पवार गटाचे संविधान सन्मान आंदोलन; रोहित पवार म्हणाले, ''मनुवादी प्रवृत्ती...
Published on

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने देशभरात विविध माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत त्या वकिलाला अटक केली; मात्र या घटनेने न्यायव्यवस्थेचा अवमान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगर आणि बारामती येथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान सन्मान आंदोलन केले.

छत्रपती संभाजीनगर येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन झाले. यावेळी संविधान वाचवा, लोकशाही वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या.

मनुवादी, RSS च्या कार्यकर्त्याने केला हल्ला

पत्रकारांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले, ''काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका वकिलाने हल्ला केला. तो RSS चा कार्यकर्ता आहे. या व्यक्तीने सरन्यायाधीशांवर हल्ला केला. ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कष्टाने ते वकील झाले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेले ते व्यक्ती आहेत. ते सुप्रीम कोर्टाचे प्रमुख आहेत, अशा व्यक्तीवर मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट मारत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे, आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो.''

न्यायालयात कंट्रोल असावा; मनुवाद्यांचा प्रयत्न

पुढे ते म्हणाले, सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आम्हा सर्वांची आहे. पण, जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मनुवादी प्रवृत्तीचे लोकं हळूहळू सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपला कंट्रोल असावा, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट इतरही जे कोर्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो. तिथेही आपला कंट्रोल असावा जेणेकरून येत्या काळात मनुस्मृती जे सांगते, ज्याला मनुवाद आपण म्हणतो; हा देशामध्ये परत आला पाहिजे असा प्रयत्न या लोकांचा आहे.''

'यांना' पुन्हा जातीवादी व्यवस्था देशामध्ये आणायची आहे

पुढे भाजपवर निशाणा साधत पवार म्हणाले, ''या सरकारला मनुवादी सरकार म्हणावे लागेल. यांना पुन्हा जातीवादी व्यवस्था देशामध्ये आणायची आहे. ती कशी येऊ शकते? जातिजातीत तेढ निर्माण केल्यामुळे ती येऊ शकते. त्याचाच प्रयत्न हे सरकार करत आहे. आज शेतकरी आणि मजूर अडचणीत आहे. शेतकरी-मजूर कोणत्या एका समाजाचा आहे का? बहुजन समाजाच्या मुलांना आज नोकऱ्या मिळत नाहीत. त्यासाठी आम्ही लढत आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही लढत आहोत,'' असे रोहित पवार म्हणाले.

बहुजनांना बदनाम करण्याचा भाजपचा डाव

पुढे ते म्हणाले, की ''हे भाजपचे नेते काय करतात? बहुजन समाजाच्या नेत्यांना आसपास ठेवतात. स्वत: स्वच्छ राहतात, सुसंस्कृत बोलतात आणि बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना पुढे करून गलिच्छ प्रकारचं भाषण या नेत्यांच्या माध्यमातून करतात. जेणेकरून हे नेते बदनाम झाले पाहिजेत. आपण मात्र स्वच्छ राहिलं पाहिजे. ते स्वत: दिल्लीचे स्वप्न बघतात. पण यामध्ये महाराष्ट्राचे जे वाटोळे होतं याबद्दल कोण बोलणार? ''

भाजपच्या उशिरा प्रतिक्रियेवर निशाणा

या प्रकरणी भाजपने उशिरा प्रतिक्रिया दिली. यावरून देखील रोहित पवार म्हणाले, ''भाजपचे नेते छोट्या गोष्टींवर त्वरित ट्विट करतात. पण, गवई साहेबांवर जो हल्ला झाला, RSS च्या कार्यकर्त्याने केला. तो हल्ला झाल्यानंतर ६-६ तासाने ८-८ तासाने तुम्ही व्यक्त होत असाल तर आम्ही काय म्हणायचं? तुम्ही सत्तेत आहात, लगेच्या लगेच त्या व्यक्तीवर कारवाई केली असती, तुम्ही तिथे गेला असतात, प्रतिक्रिया दिली असती तर एक संदेश गेला असता जे आज सत्तेत आहेत ते मनुवादाला सपोर्ट करणारे नाहीत. आज तुम्ही उशिरा प्रतिक्रिया दिल्याने कुठेतरी लोकांच्या लक्षात आलं आहे, की सत्तेतले मुद्दामून मनुवादाला ताकद देत आहेत.''

बारामतीतही संविधान सन्मान आंदोलन

या घटनेच्या निषेधार्थ बारामतीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या निदर्शनात खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले, “सर्वोच्च न्यायालय हे देशातील न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे संपूर्ण संविधानावर हल्ला आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.”

logo
marathi.freepressjournal.in