कोल्हापूर/मुंबई : ‘काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करावे, शिवसेना (ठाकरे गट) त्याला पाठिंबा देईल,’ असे विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतरच संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांची निवड करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उघड न करता एकत्रपणे निवडणूक लढेल, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. पवारांच्या भूमिकेचे काँग्रेसने समर्थन केले असून आम्ही मविआ म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी बुधवारी कोल्हापुरात महविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविषयी सांगितले की, “सध्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर जोर देण्यात अर्थ नाही. महाविकास आघाडी एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेईल. विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री कोण होणार, हे निश्चित केले जाईल. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळणे आवश्यक आहे. जनतेच्या पाठिंब्यानंतर राज्याला स्थिर सरकार देणे आवश्यक आहे.”
“१९७७ साली आणीबाणीनंतर देशात निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीला कोणालाही पुढे केलेले नव्हते. या निवडणुकीत जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्वजण एकत्र आल्यानंतर निवडणुकीत कोणताही चेहरा नव्हता. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले. तोपर्यंत त्यांचे नाव कुठेही आले नव्हते. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्कता नाही, आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्याला देऊ,” अशी आठवणही पवारांनी यावेळी सांगितली.
“राज्यात आमची सत्ता येईल, असे चित्र आहे. मात्र याचे नेतृत्त्व कोण करणार, यावर अजून कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही याचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर घेणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मात्र विरोधी भूमिका घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात -सुप्रिया सुळे
“राज्यात महिलांची सुरक्षा, वाढती महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. या सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एक अशी गोष्ट नाही जिथे भ्रष्टाचार झाला नाही. सगळ्यात आधी हे आम्हाला साफ करावे लागेल. माझ्या मते, राज्याचा मुख्यमंत्री हा दिल्लीच्या समोर झुकलेला नाही आणि भविष्यात झुकणार नाही, असा हवा. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. तसेच काँग्रेस पक्षाचा नेतासुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो. आमच्यासाठी सेवा महत्त्वाची आहे. आम्ही पदाला महत्त्व देत नाही. तुम्हाला देशाची सेवा करायची असेल तर तुम्ही कोणत्या पदावर आहात, हे महत्त्वाचे नाही. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद नको आहे, हे शरद पवारांनी सांगितलं आहे.”
शरद पवार काहीच चुकीचे बोलले नाहीत - पटोले
शरद पवारांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांचे जोरदार समर्थन केले. “शरद पवार काहीही चुकीचे बोलले नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातच आम्ही या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर चर्चा केली. त्यामुळे या प्रकरणी वेगळा अर्थ काढण्याचा प्रश्न नाही,” असे पटोले म्हणाले.