

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत रक्कम बँक खात्यात जमा केल्यास एक कोटीहून अधिक महिला मतदारांवर त्याचा थेट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिका निवड-णुकांच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक महिला मतदार प्रभावित होण्याची
शक्यता असून, निवडणुकीच्या दिवशी सत्तारूढ पक्षाच्या उमेदवा-रांना मतदान करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. ही कृती म्हणजे एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच असून, त्यामुळे आदर्श आचारसं-हितेचा भंग होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
लाडकी बहीण योजनेला पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत, डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या कालावधीतील योजनेची रक्कम निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत-रच वितरित करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.