मविआत ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री? काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

काँग्रेस महाविकास आघाडीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मविआत ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री? काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
Published on

महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस महाविकास आघाडीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका काँग्रेसनं घेतल्याचं समोर येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं ४८ पैकी ३० जागा जिंकत महायुतीला चारीमुंड्या चीत केलं. यामध्ये काँग्रेसनं सर्वाधिक १३, शिवसेना उबाठा ९ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं ८ जागांवर विजय मिळवला. दरम्यान महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार आहे. लोकसभा निवडणूकीतील विजयामुळं उत्साह द्विगुणीत झालेल्या महाविकास आघाडीनं आता आपलं लक्ष विधानसभा निवडणूकांवर केंद्रीत केलं आहे. महाविकास आघाडीनं यावेळी विधानसभेत सत्तेवर यायचंच, या निर्धारानं काम सुरु केल्याचं दिसत आहे.

मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा या तीन प्रमुख पक्षांमध्ये निवडणूकीसाठी रणनिती आखणं सुरु झालं आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बैठक पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतून लढवायचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी भूमिका घेण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांसह काँग्रेसचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in