मविआमध्ये वादाची ठिणगी; कोल्हेंची काँग्रेस, उद्धव ठाकरे गटावर टीका, वडेट्टीवारांचा मविआला घरचा आहेर

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.
अमोल कोल्हे, विजय वडेट्टीवार (डावीकडून)
अमोल कोल्हे, विजय वडेट्टीवार (डावीकडून)
Published on

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आघाडीतील तीनही पक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटावर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी चंद्रपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. नाना पटोले आणि खासदार संजय राऊत हे जागावाटपाच्या चर्चेत होते. त्याठिकाणी आम्हीही होतो. जर जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता, तर १८ दिवस प्रचाराला मिळाले असते. आम्हाला योग्य नियोजन करता आले नाही. योग्य तो कार्यक्रम आखता आला नाही. त्यामुळे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ असे अनेक मुद्दे महाविकास आघाडीच्या पराभवासाठी कारणीभूत होते, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ‘बचेंगे तो और लढेंगे’ ही भूमिका कायम शिवसेनेने घेतली आहे. याचा अर्थ आम्ही राहिलो नाही असे नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, मोडलो नाही. आमचे २० आमदार आहेत, त्यातील एकाचेही म्हणणे नाही की आपण समोर फुटलेल्या गटात सहभागी व्हायचे आणि सत्तेची ऊब घ्यायची हे आमच्यात कुणी सांगत नाही. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढत राहू, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांना खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

तत्पूर्वी, अमोल कोल्हे यांनीही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटावर टीका केली होती. पराभवानंतरही काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही आणि ठाकरे गट अजूनही झोपेत आहे, असे ते म्हणाले होते. यासंदर्भात विचारले असता, अमोल कोल्हे यांनी आधी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ले कमी द्यावेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

हे सर्व पूर्वनियोजित?

विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी सकाळी ११ ची वेळ ठरायची. परंतु मविआचे काही नेते दुपारी २ वाजता यायचे. जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणे अपेक्षित असताना २० दिवस गेले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले त्या अनेक कारणांपैकी हे एक कारण होते. या सगळ्यावरून हे सर्व पूर्वनियोजित होते का, अशी शंका निर्माण होते. जर जागावाटपाबाबत लवकर निर्णय घेतला असता, तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असता, पण वेळ घालवण्यामध्ये काही षडयंत्र होते का हे तपासावे लागेल, अशा संशयही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्या होत्या - संजय राऊत

जागावाटपावर वाद होता. अनेक जागा अशा होत्या ज्या आम्ही जिंकू शकलो असतो, पण काँग्रेसने त्या सोडण्यास नकार दिला. चंद्रपूर, कोल्हापूर उत्तरची जागा. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही सहा वेळा जिंकलो, आम्ही ती मागत होतो, पण सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही, प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या. कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचे मुख्यमंत्रीपद हवे होते, असा टोला राऊत यांनी वडेट्टीवार यांना लगावला. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा (जागावाटपाच्या चर्चेत) हस्तक्षेप केला नाही, तो करायला पाहिजे होता, असेही राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in