बीडमध्ये गुन्हेगारचे थैमान! ''संतोष देशमुख पार्ट-२ करायचा'', तरुणाला अमानुष मारहाण

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांनी भयावह वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचे पडसाद अजूनही ताजे असतानाच, परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील शिवराज दिवटे या तरुणावर टोळक्याने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज आणि विविध संघटनांनी 19 मे रोजी बीड बंदची हाक दिली आहे.
बीडमध्ये गुन्हेगारचे थैमान! ''संतोष देशमुख पार्ट-२ करायचा'', तरुणाला अमानुष मारहाण
Published on

परळी : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांनी भयावह वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचे पडसाद अजूनही ताजे असतानाच, परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील शिवराज दिवटे या तरुणावर टोळक्याने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज आणि विविध संघटनांनी 19 मे रोजी बीड बंदची हाक दिली आहे.

१७ मे रोजी बीडमधील जलालपूर येथील एका धार्मिक समारंभात पंगतीदरम्यान शिवरज दिवटे आणि समाधान मुंडे यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर समाधान मुंडे व त्याच्या साथीदारांनी घरी परतणाऱ्या शिवराज दिवटे याला परळी येथे पेट्रोलपंपाजवळ अडवले. त्याला अज्ञात डोंगराळ भागात नेले आणि तेथे लाठ्याकाठ्या, बेल्ट व हातांनी बेदम मारहाण केली. मारहाण इतकी क्रूर होती की दिवटे यांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

शिवराजवर मारहाण करताना आरोपींनी “याला सोडायचं नाही, संतोष देशमुख पार्ट-2 करायचा” असे उद्गार काढल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. या घटनेचा व्हिडिओ आरोपींकडूनच सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हे वक्तव्य संतोष देशमुख हत्येच्या पार्श्वभूमीवर दिल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

शिवराज दिवटे याला गंभीर जखमी अवस्थेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपींची ओळख

या प्रकरणी परळी पोलिसांनी समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेष गिरी, प्रशांत कांबळे, सौमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे यांच्यासह आणखी 11 अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

सदर टोळक्यातील अनेक तरुण 18 ते 19 वयोगटातील असून, ते टोकवाडी, डाबी, नंदागौळ व परळी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आतापर्यंत समाधान मुंडे, सचिन मुंडे, रोहन वाघुळकर, आदित्य गित्ते, तुकाराम गिरी यांना अटक करून 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे.

ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

रविवारी सकाळी ग्रामस्थांनी बीड - परळी मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे की, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

लोकप्रतिनिधी आणि सामाजिक नेत्यांची प्रतिक्रिया

या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे यांची भेट घेतली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही रुग्णालयात भेट देत दिवटे याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि जखमा पाहून कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते.

यावेळी रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने मराठा समाजाने गर्दी केली. "एक मराठा लाख मराठा", "परळीच्या गुंडाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

सुरेश धस यांची संतप्त प्रतिक्रिया

भाजप आमदार सुरेश धस यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे. शिवाय अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टरांनी गुन्हेगारांना अभय दिल्याचा आरोप करत, "हेच डॉक्टर पाय मोडला तरी खरचटले असा रिपोर्ट देतात," असे सांगून त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आवाहन केले आहे की, ही मारहाण वैयक्तिक वादातून घडली असून, घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. तपासासाठी विशेष पथक नेमले असून, व्हिडीओ फुटेज, मोबाइल लोकेशन आणि साक्षीदारांच्या आधारे तपास सुरू आहे.

19 मे – बीड बंदची हाक

या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मराठा समाज व विविध संघटनांकडून 19 मे रोजी बीड बंदची हाक दिली गेली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शिवराज दिवटे याच्यावर झालेली क्रूर मारहाण ही केवळ गुन्हेगारी घटना नसून, समाजातील अस्वस्थतेचा आरसा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासनाचे कार्यप्रणाली आणि सामाजिक सलोखा यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीडमध्ये तरुणांमध्ये वाढणारी गुन्हेगारी वृत्ती बीडच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in