

मुंबई : मुंबईसह राज्यात जल्लोषात साजरा झालेल्या उत्सवाला अनेक अपघातांचे गालबोट लागून त्यात दोघांचा मृत्यू झाला. मालवणीमध्ये विटांची भिंत पडून सात वर्षीय मुलाचा बळी गेला, तर पुण्यात लोखंडी कमान कोसळून महिला मरण पावली. मुंबईभरात संध्याकाळपर्यंत २०० गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हंडी फोडण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो रुपयांची बक्षिसे असल्याने गोविंदा पथकांमध्ये प्रचंड चढाओढ दिसून आली. अनेक गोविंदा पथकांनी ८, ९ थर उभारत सलामी दिली. मात्र दुर्दैवाने यामध्ये काही अपघाताच्या घटनाही घडल्या.
जखमींपैकी ८० जखमी गोविंदांवर ओपीडी बेसवर उपचार सुरू आहेत. ५ जणांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ दुखापत झाल्याने ३३ जखमी गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
ढोल ताशांच्या तालावर थिरकत थरावर थर मानवी मनोरे रचून मुंबईत विविध ठिकाणी शनिवारी दहीहंडी फोडण्यात आली. काही राजकीय नेत्यांच्या लाखोच्या बक्षीसांच्या दहीहंड्या फुटल्या. राजकीय नेते, सेलिब्रिटी तसेच काही दहीहंड्याना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी नेते उपस्थित होते. ठिक ठिकाणी गोविंदा आला रे आलाचा ललकार, तर काही ठिकाणी लेझीम पथकाचा ताल अशा जल्लोषात उत्सव पार पडला.
काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, घाटकोपर, फोर्ट, चेंबूर, जोगेश्वरी, वरळी जांभोरी मैदान आदी ठिकाणी एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणच्या आयोजकांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय केली होती. दादरसह काही मार्ग बंद करण्यात आले होते.
वरळी येथील जांबोरी मैदानावर मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अॅड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने भव्य 'परिवर्तन दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नशामुक्ती अभियानाची दहीहंडी फोडण्यात आली आणि 'ड्रग्स फ्री महाराष्ट्र'चा संकल्प करण्यात आला.
दहीहंडीच्या उत्साहात दादर येथील नयन फाऊंडेशनच्या गोविंदा पथकाने विशेष लक्ष वेधून घेतले. दृष्टिहीन मुलांच्या गोविंदा पथकाने मानवी मनोरा रचून जिद्द आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. दृष्टीदोष असतानाही केवळ समन्वय, सहकाऱ्यांवरील विश्वास आणि सरावाच्या बळावर या गोविंदांनी मानवी मनोरा साकारल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
दादर येथील आयडियलची दहिहंडी २६ वर्षांपासून आयोजित केली जाते. ही दहिहंडी महिलांच्या पथकांनी फोडली. हे महिला पथक पारले, वरळी आदी पूर्व उपनगरांतील दहिहंड्या फोडतानाचा विक्रम करतात.
गल्लोगल्ली छोट्या मोठ्या दहिहंडी उभारल्या होत्या. त्या फोडण्यासाठी पथकांची चढाओढ सुरू होती. शेकडो गाड्यांमधून गोविदा पथके दहिहंडी फोडत पुढे निघत होते. लाऊड स्पिकर, ढोल, ताशे यांचा दणदणाट गोविदांचा उत्साह वाढवित होता. गोविंदा रे गोपाळा' बोल बजरंग बली की जय' असा जयघोष करीत मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह द्विगुणीत होत असतानाच दुपारनंतर अगदी काहीवेळ पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने गाँवदांच्या उत्सवात भर पडली. गोविंदा पथकांतील गोविंदा उंचच उंच मानवी मनोरे रचत होते. मुंबईभरात जल्लोषपूर्ण वातावरणात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.
बाईक स्वार गोविंदांना वेगाची झिंग
गोविंदांनी बाईक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर काढल्या होत्या. या बाईक रस्त्यांवर सुसाट धावताना दिसत होत्या. अनेक गोविदांना वेगाची झिंग चढल्याचे दिसत होते. बाईक स्वारांकडून हेल्मेट वापर केला जात नव्हता. सुरक्षेचे नियम पाळल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
घाटकोपरमध्ये ५१ लाखांची हंडी?
मुंबईतील सर्वाधिक जाहीर बक्षिसाची दहीहंडी घाटकोपरमध्ये आयोजित करण्यात आली होती. मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या पुढाकाराने अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीला तब्बल ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र, या मोठ्या बक्षिसाच्या दहीहंडीला उत्सवाच्या आदल्या दिवशी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वाद निर्माण झाला. मनसेकडून या दहीहंडीची 'विश्वविक्रमी दहीहंडी' अशी जाहिरात करण्यात आली होती. परवानगी नाकारल्यानंतरही दहीहंडीचे आयोजन केल्याचे समजते.