न्यायालयाने नवा आदर्श निर्माण केला - नसरापूर निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या ५९ दिवसांत तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी सोमवारी विधानसभेत न्यायालय, पोलीस आणि सरकारी वकिलांचे विशेष आभार मानले.
न्यायालयाने नवा आदर्श निर्माण केला - नसरापूर निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
न्यायालयाने नवा आदर्श निर्माण केला - नसरापूर निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या ५९ दिवसांत तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी सोमवारी विधानसभेत न्यायालय, पोलीस आणि सरकारी वकिलांचे विशेष आभार मानले.

अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून या प्रकरणाने देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. या प्रकारच्या गुन्ह्यातील नराधमांना जरब बसवायची असेल तर वेळेत न्याय मिळणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “नसरापूर येथे १ मे रोजी तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच २ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल होताच आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांत म्हणजे १६ मे रोजी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. २८ मे रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले आणि त्यानंतर सलग सुनावणी घेत केवळ २९ दिवसांत ५५ साक्षीदारांची तपासणी आणि उलटतपासणी पूर्ण करण्यात आली. २५ जून रोजी आरोपीला दोषी ठरविण्यात आले आणि २९ जून रोजी न्यायालयाने त्याला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली.”

या प्रकरणात न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांनी सुट्ट्याही रद्द करून सातत्याने सुनावणी घेतल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

इतर प्रकरणांतही जलद न्याय मिळवून देणार

पीडित चिमुकलीच्या पालकांचे दुःख कोणीही भरून काढू शकत नसले, तरी अशा नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा झाल्याने त्यांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली असेल. मात्र, भविष्यातही अशा प्रकरणांमध्ये जलद आणि प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in