मच्छिमारीवरील डिझेल दरवाढ कायम; प्रति लिटर २२ रुपयांची वाढ, केंद्राकडून दिलासा नाही

युद्धजन्य आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन दरात कपात करणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट करत हरदीप सिंग पुरी यांनी मच्छिमारांच्या शिष्टमंडळाला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
मच्छिमारीवरील डिझेल दरवाढ कायम; प्रति लिटर २२ रुपयांची वाढ, केंद्राकडून दिलासा नाही
मच्छिमारीवरील डिझेल दरवाढ कायम; प्रति लिटर २२ रुपयांची वाढ, केंद्राकडून दिलासा नाही'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

संजय करडे /मुरूड-जंजिरा

युद्धजन्य आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन दरात कपात करणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट करत हरदीप सिंग पुरी यांनी मच्छिमारांच्या शिष्टमंडळाला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. या भूमिकेमुळे किनारपट्टीवरील मच्छिमार संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डिझेल दरात प्रति लिटर तब्बल २२ रुपयांची वाढ झाल्याने मच्छिमारांचे कंबरडे मोडले असून अनेक यांत्रिक बोटी समुद्रात न जाता किनाऱ्यावरच थांबल्या आहेत. मुरूड-जंजिरा तालुक्यातील राजपुरी, एकदरा आणि मुरूड किनाऱ्यावर सुमारे ९० टक्के बोटी नांगरून ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.

मच्छिमारीवरील डिझेल दरवाढ कायम; प्रति लिटर २२ रुपयांची वाढ, केंद्राकडून दिलासा नाही
आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

सामान्य पंपावर डिझेल सुमारे ९२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध असताना, मच्छिमारांना 'बल्क कॅटेगरी'तून ११४ रुपये प्रति लिटर दराने डिझेल घ्यावे लागत आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली असून उत्पन्न घटल्याने मच्छिमार दुहेरी संकटात सापडले आहेत.

मच्छिमार संघटनांचे म्हणणे आहे की, सहकारी संस्थांमध्ये समावेश असलेल्या मच्छिमारांना 'बल्क ग्राहक' श्रेणीत ठेवणे अन्यायकारक आहे. त्यांना या श्रेणीतून वगळून सवलतीच्या दरात डिझेल द्यावे, अशी मागणी होत आहे.

"सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली"

सरकारकडून कोणताही ठोस दिलासा मिळाला नाही. तातडीने अनुदान, सवलतीचे डिझेल किंवा आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्य मच्छिमार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी केली. डिझेल दरवाढीमुळे सध्या केवळ १० टक्के मच्छिमारच समुद्रात उतरत असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित दोन महिन्यांचा मासेमारी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in