

मुंबई : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात ३.११ ने म्हणजेच सरासरी प्रति लिटरला ३ रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे वर्षाला अंदाजे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका महामंडळाला बसणार आहे. त्यामुळे राजस्थान सरकारप्रमाणे सरकारने एसटीला व्हॅटमध्ये सूट द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.
एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागत असून इंधनावर वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी खर्च होत आहे. मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी व महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर २१ टक्के इतका असल्याने व त्या तुलनेत गुजरात मध्ये मूल्यवर्धित कर १४.९ टक्के इतका कमी असल्याने महामंडळाने गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या एसटीला सरासरी ८८ रुपये प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करावी लागत आहे.
... तर एसटीसाठी धोक्याची घंटा ठरेल
एसटी ही सार्वजनिक वाहतूक असल्याने तिला मदत व्हावी, यासाठी राज्यस्थान सरकारने तिथल्या एसटीच्या इंधन दर खरेदी मूल्यवर्धित करात सूट दिली आहे. सध्या राज्यस्थानमध्ये १८.५ टक्के इतका मूल्यवर्धित कर असला तरी तिथल्या एसटीला त्यात सूट मिळाली असून तो १४ टक्के इतका आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करातून सूट दिली पाहिजे अन्यथा १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व ५ हजार कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत असलेल्या एसटीसाठी ही धोक्याची घंटा ठरेल, अशी भीती एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.