
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप सातत्याने करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासाठी, निवडणूक आयोगाने राहुल गांधींना मेल आणि पत्राद्वारे थेट चर्चेसाठी निमंत्रण पाठवले आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या सोयीनुसार तारीख आणि वेळ निश्चित करून आयोगाला कळवावे, आम्ही त्यांच्या सर्व शंका दूर करू, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेवर ७ जूनला राहुल गांधी यांनी लेख लिहिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना हे पत्र पाठवले आहे. निवडणूक आयोगाने १२ जूनला राहुल गांधी यांना हे पत्र मेलद्वारे पाठवले आहे आणि ते त्यांच्या निवासस्थानी पोचपावतीसाठीही पाठवले आहे.
आयोगाच्या बैठका
निवडणूक आयोग आता काँग्रेस पक्षासोबतच्या बैठकीत राहुल गांधींना प्रामुख्याने आमंत्रित करू इच्छित आहे, ज्यामुळे निवडणुकीशी संबंधित त्यांच्या शंका दूर करता येतील.आयोगाने अलीकडेच काँग्रेस वगळता भाजप, बसपा, आप, सीपीआय आणि एनपीपी यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बसपा सुप्रीमो मायावती, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, एनपीपी अध्यक्ष कोनराड संगमा आणि सीपीआयचे (एम) वरिष्ठ नेते या बैठकांमध्ये सहभागी झाले होते.
नियमांनुसार निवडणूक घेतो!
राहुल गांधींना चर्चेसाठी पाठवलेल्या पत्रात आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक आयोग संसदेने पारित केलेल्या कायद्यांनुसार आणि बनवलेल्या नियमांनुसार कोणतीही निवडणूक घेतो. यामुळे निवडणुकीत हेराफेरीची चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. आयोगाने राहुल गांधींना सांगितले आहे की, त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीत केलेल्या हेराफेरीच्या आरोपांना २४ डिसेंबर २०२४ रोजी लेखी स्वरूपात सविस्तर उत्तरे दिली आहेत.
फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत ८ टक्के मतदार वाढले - राहुल गांधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात (दक्षिण-मध्य नागपूर) मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले होते. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचे निदर्शनास आले आहे, असा नवा दावा आता राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘न्यूजलॉन्ड्री’ या संकेतस्थळावरील माहिती शेअर करत म्हटले आहे की, बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार केली आहे. ज्यांच्या पत्त्यांची पडताळणी झालेली नाही असे हजारो मतदार प्रसारमाध्यमांनी शोधून काढले आहेत. मात्र, या सगळ्यावर निवडणूक आयोगाने मौन बाळगले आहे. निवडणूक आयोगही या घोटाळ्यात सहभागी आहे का? असा प्रश्नही त्यामुळे निर्माण होत आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार याद्या आणि मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत.
तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार - फडणवीस
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो', असे म्हणत तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार? असा सवाल फडणवीस यांनी केला आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली. तसेच मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्यामुळे काँग्रेसचे कोणते उमेदवार निवडून आले, याची माहितीही फडणवीस यांनी ट्विटमध्ये दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी महाराष्ट्रातील मोठ्या पराभवामुळे दुःखी आहेत. पण त्यांच्या माहितीसाठी स्पष्ट करतो की, महाराष्ट्रात २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, जेथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ७ टक्के मतदारांची (२७,०६५) वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी निवडणूक जिंकली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
उत्तर नागपुरात मतदारांमध्ये ७ टक्के (२९,३४८) वाढ झाली आणि काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथे १० टक्के (५०,९११) मतदारांची वाढ झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मालाड पश्चिममध्ये ११ टक्के (३८,६२५) मतदारांची वाढ झाली आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये मतदारांमध्ये ९ टक्के (४६,०४१) वाढ झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.