भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई; सत्तेच्या गैरवापराचा शरद पवार यांचा आरोप

या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. हे करत असताना ईडी कोणाच्या मागे लागली.
भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई; सत्तेच्या गैरवापराचा शरद पवार यांचा आरोप
@ANI
Published on

पुणे : भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. अगोदर लोकांना ईडी काय आहे हे माहिती नव्हते. भाजप सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांतील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदारांचा समावेश आहे, याचा काय अर्थ काढायचा? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी ते बोलत होते. पवार म्हणाले, “आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत. केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपच्या हातात आहे. त्यांची धोरणे सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणारी आहेत. शनिवारी लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काहीही विधायक सांगितलं नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत भाषण केले होते. त्यावेळीही त्यांनी इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यावरच भाष्य केलं. नेहरूंनी लोकशाही रुजवली, लोकशाहीचं शासन दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी यांनी केले. मला समजत नाही की, त्याने काय साध्य होणार आहे. ज्यांनी देशाला दिशा दिली, देशासाठी कष्ट केले, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही,” असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करताना पवार म्हणाले, “आज भाजपच्या विचाराच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाते. अगोदर लोकांना ईडी हा शब्द माहीत देखील नव्हता. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. २००५ ते २०२३ या १८ वर्षांच्या कालावधीत ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली. चौकशी केल्यानंतर सत्यावर आधारित फक्त २५ खटले निघाले. त्या २५ खटल्यांपैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. हे करत असताना ईडी कोणाच्या मागे लागली. गेल्या १८ वर्षांत १४७ नेत्यांची चौकशी झाली. त्यात ८५ टक्के नेते विरोधी पक्षाचे होते. भाजप सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश होता,” अशी आकडेवारी शरद पवार यांनी सादर केली. यामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नाही. भाजपच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबवण्यात आली. याचा अर्थ काय काढायचा? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

निवडणूक आयोगाचा निकाल ‘आश्चर्यकारक’

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार बेचैन झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल हा ‘आश्चर्यजनक’ आहे. ज्यांनी पक्षाची स्थापना केली, त्यांच्याच हातातून पक्ष काढून दुसऱ्याच्या हातात दिला, असे पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in