मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दुराव्यावर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; "तुम्ही सगळे फक्त ब्रेकिंग न्यूजसाठी...

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढल्याच्या चर्चेला काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र यावर आज (दि. २३) सोलापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र ANI
Published on

शिवसेना मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, शिंदेंची फडणवीसांच्या कार्यक्रमाला पाठ, यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढल्याच्या चर्चेला काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र, यावर आज (दि. २३) सोलापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मौन सोडले. ब्रेकींग न्यूज आणि टीआरपीसाठी अशा मनगढण गोष्टी चालवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

तुम्हीच प्रश्न विचारता आणि हे सगळं...

हुतात्मा चौक येथील कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदे यांच्यातील अबोला आणि मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात दोन्ही नेते परस्परांपासून अंतर ठेवून बसल्याचे दृश्य यामुळे या नेत्यांमधील दुराव्याची चर्चा अधिकच गडद झाली होती. यावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्हीच प्रश्न विचारता आणि हे सगळं घडवून आणता. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा सत्कार होता आणि त्या दोन्ही खुर्च्या त्यांच्यासाठी होत्या. कारण, ते दोघेही सत्कारमूर्ती होते. एका खुर्चीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि मध्ये ते दोघं त्यानंतर दुसऱ्या बाजूला मी होतो. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज आणि टीआरपीसाठी अशा मनगढण गोष्टी चालवल्या जातात", असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि त्यांच्यातील दुराव्यावर स्पष्टीकरण दिले.

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले होते. त्यावेळी फडणवीस आणि शिंदे यांनी आपसात कोणताही संवाद साधला नव्हता. दोघेही आमनेसामने आले तरी दोघांची देहबोली मात्र पूर्णपणे बदललेली दिसली होती. तसेच, शनिवारी (दि. २२) मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या फाउंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दोन खुर्च्यांचं अंतर ठेऊन बसले होते. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आल्याची चर्चा बळावली होती. परंतु यावर आता शिंदेंनी उत्तर दिले आहे.

शिंदेंची दिल्लीवारी

भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद काही दिवसांपासून चव्हाट्यावर आले आहेत. शिंदे गटातील नगरसेवकांना मोठे आमिष दाखवून फोडाफोडी होत असल्याच्या आरोपांमुळे नाराजी वाढत चालली आहे. त्यानंतर शिंदे यांनी दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, शहा यांनी फक्त परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगून ठोस आश्वासन न दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर बिहारच्या शपथविधीसाठी फडणवीस-शिंदे यांनी स्वतंत्र केलेला प्रवास आणि कार्यक्रमातही दोघांमध्ये न झालेला संवाद यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या चर्चा फोल ठरल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in