महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरु करून महिलांच्या मनात घर केले होते. थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करणाऱ्या या योजनेमुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. काही दिवसांपूर्वी या योजनेचे पैसे थांबणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या; मात्र शिंदेंनी "दिलेला शब्द कधीही फिरवणार नाही" असं स्पष्ट करून योजना सुरूच राहील, असं सांगितलं. आता याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचं अभियान हाती घेतलं आहे. ते म्हणजे ‘लाडकी सून अभियान’.
काय आहे हे अभियान -
सुनांच्या रक्षणासाठी पक्षस्तरावर उपक्रम
एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं की, ही योजना सरकारकडून नाही तर त्यांच्या शिवसेना पक्षाकडून राबवली जाणार आहे. "महाराष्ट्रात कुठल्याही लेकी-सुनांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येक घरातील सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या सुनांचा छळ सहन केला जाणार नाही," असं शिंदे म्हणाले. या अभियानासाठी शिवसेनेने हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत.